Student Seminar Report & Project Report With Presentation (PPT,PDF,DOC,ZIP)

Full Version: rainwater harvesting in marathi language pdf
You're currently viewing a stripped down version of our content. View the full version with proper formatting.

Guest

information about rainwater harvesting in marathi language
पाणी तारक आहे, पाणी विध्वंसकही आहे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत आपण पाण्याच्या नैसर्गिक समतोलामध्ये ढवळाढवळ करीत नाही, तोपर्यंत पाणी अतिशय विवेकी आहे. प्राचीन संस्कृती, जसे सिंधु-मोहेंजोदडो संस्कृती असो की काही शे-दीडशे वर्षांपूर्वीचे संतवाङ्मय असो, प्रत्येक ठिकाणी जलसंस्कृतीचे एक अढळ अस्तित्व दिसते. आता काही सर्वांना माहीत असणा-या सत्याचा थोडा परामर्श घेणे अनुचित ठरणार नाही. आपल्या शरीराचा ६० टक्के भाग, मेंदूचा साधारण ७० टक्के भाग आणि रक्ताचा सुमारे ८० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. संपूर्ण पृथ्वीतलावर एकूण उपलब्ध पाण्यापैकी साधारणत: फक्त ३ टक्के पाणी गोड पाणी असून, उरलेले ९७ टक्के पिण्यायोग्य नाही. त्या ३ टक्के पाण्यापैकी साधारण ७० टक्के पाणी गोठलेल्या स्वरूपात असून, फक्त उरलेले ०.३ टक्के पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे. या पाण्याचा स्रोत, नदी, झरे, भूजल आणि सर्वांत जास्त पावसाचे पाणी आहे. साधारणत: जोपर्यंत आपण पावसाचे पाणी प्रदूषित करत नाही तोपर्यंत पावसाचे पाणी अतिशय शुद्ध स्वरूपात उपलब्ध असते.
पाणीप्रश्न निर्माण होण्यामध्ये आपलाही खारीचा वाटा आहेच. पण तो सोडवण्यासाठीही आपण खारीचा वाटा कसा उचलू शकतो, हे समजून घेणे उपयुक्त ठरेल. कमी-अधिक प्रमाणात पाऊस सर्वत्र पडतो. पण हा सर्वत्र पडणारा पाऊस जास्तकरून वायाच जातो. याचे एक वैचित्र्यपूर्ण उदाहरण म्हणजे, जगातील सर्वात जास्त पाऊस असणा-या चेरापुंजीला (वार्षिक ११ मी.पेक्षा जास्त) ब-याच वेळा पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तेथील नागरिकांना पाण्यासाठी अनेक तासांची पायपीट करावी लागते. कारण इतका प्रचंड पाऊस पडूनसुद्धा तेथे पावसाच्या पाण्याच्या संधारणाची आणि एकंदर पाण्याच्या नियोजनाची कोणतीही योजना प्रभावीपणे राबवली गेली नाही. हे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपाचे ठरावे. अशीच परिस्थिती आज भारतात, विशेषकरून निसर्गाचा वरदहस्त ठरलेल्या महाराष्ट्रात आहे आणि म्हणून उपलब्ध पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संधारण हा एकूणच समस्याचक्रातील कळीचा मुद्दा आहे. शास्त्रीयदृष्ट्या पावसाच्या पाण्याचे संधारण या संज्ञेमध्ये पावसाचे पाणी गोळा करणे, साठवणे, पावसाचे पाणी शुद्ध करून त्याच्या साहाय्याने जमिनीखालील पाण्याच्या साठ्याची पातळी वाढवणे, पावसाच्या पाण्याच्या जमिनीवरील साठ्यामधून होणा-या बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करणे अशा उपाययोजनांचा उपयोग होतो. यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करणे उचित ठरेल. १) छतावरील / परिसरातील पावसाच्या पाण्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे. यामध्ये इमारतीचे छत, घराचे छत अथवा गच्ची तसेच आपल्या परिसरातील छत नसलेल्या जमिनीचाही समावेश होतो. या परिसरातून मिळणा-या पाण्याचे प्रमाण खालील गोष्टींवर अवलंबून असते.
त्या परिसरात पडणारा वार्षिक पाऊस, तापमान, आर्द्रता, ज्या पृष्ठभागावरून पावसाचे पाणी गोळा करायचे आहे त्याचा प्रकार, त्या प्रदेशातील मातीचा प्रकार, त्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता इत्यादी. तसेच या सर्व घटकांचा विचार करून त्या परिसरासाठी योग्य जलसंधारणाची पद्धत अवलंबल्यास ती नक्की यशस्वी होते.
याचे पुढील प्रकारे फायदेही मिळतात. १) योग्य प्रकारे जलसंधारण आणि नियोजन केल्यास, पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. २) जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. ३) जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणा-या विजेच्या वापरात बचत होते. ४) जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे dilution झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. ५) जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते. ६) गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत. ७) जलसंधारणाच्या ब-याच पद्धती या बांधण्यासाठी, वापरण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी अतिशय सोप्या आहेत. ८) समुद्री प्रदेशाजवळील भागांमध्ये, जमिनीखालील खा-या व क्षारयुक्त पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी जलसंधारण महत्त्वाचे काम करते. ९) निसर्गात अधिक स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणा-या पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. विविध प्रदेश, तेथील पर्यावरण आणि परिसरानुसार पावसाच्या पाण्याच्या संधनासाठी वेगवेगळ्या पद्धती उपलब्ध असल्या तरी ढोबळमानाने जलसंधारण हे दोन प्रकारात वर्गीकृत करता येते - १) मिळणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे. २) मिळणारे पावसाचे पाणी विविध प्रकारे गोळा करून पूर्णत: वा अंशत: साठवणे व वर्षभर किंवा मर्यादित काळासाठी वापरणे. यात पहिल्या प्रकाराने संधारण केल्यास तुलनेने अतिशय कमी खर्चात पाण्याचे संधारण करता येते. पण संधारण केलेले काही पाणी जमिनीत मुरून काही अंशी पाणी वापरास उपलब्ध होते. दुस-या प्रकारात संधारण केलेले संपूर्ण पाणी वापरण्यास मिळू शकते. पण त्यासाठी मोठ्या क्षमतेच्या साठवण टाकीची आवश्यकता असते, जी खूप खर्चिक बाब ठरू शकते. तसेच ही व्यवस्था सांभाळणे व चालवणेही सर्वसामान्य लोकांसाठी जिकिरीचे ठरू शकते. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारात जलसंधारण केले तरी त्या प्रकारांचे अनेक फायदे आहेत. आज या गोष्टीची जाणीव झाल्यामुळेच विविध पालिका, महापालिकांनी नव्या आणि जुन्या इमारतींना अशा प्रकारचे जलसंधारण अनिवार्य केले आहे.